Home Uncategorized काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही…

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही…

8 second read
0
0
963

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून पूर्ण कोल्हापूर शहराला मुबलक पाणी मिळावे, यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशिल आहे. पाईपलाईनचे व्हॉल्व बदलणे आणि अन्य कामांसाठी आजपर्यंत ५ कोटी रूपये जिल्हा नियोजन समितीमधून दिले आहेत. योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी लागेल तो निधी दिला जाईल. तसेच या योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाच्या पहाणीवेळी ते बोलत होते.

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झालीय खरी, पण अजुनही काही भागातच या योजनेचा पाणी पुरवठा होत असून, निम्म्या कोल्हापूर शहराला या योजनेचे पाणी मिळालेले नाही. ज्या भागात काळम्मावाडी योजनेचे पाणी सुरू झाले आहे, त्या भागात पुरेशी वितरण व्यवस्था नसल्याने, नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची आंदोलने होत आहेत. शिवाय महिलाही त्रस्त झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी आज भाजप कार्यकर्त्यांसमवेत पुईखडी इथल्या जलशुध्दीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजीत कदम, किरण नकाते, आशिष ढवळे, प्रदिप उलपे, मनीषा कुंभार, रिंकू देसाई, वैभव माने, शैलेश पाटील, राजू जाधव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. जलअभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची माहिती दिली.

काळम्मावाडी पंपिंग स्टेशनमधील चार पैकी दोन पंप सुरू आहेत. अमृत योजनेतून पाण्याच्या १२ टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी ४ पूर्ण झाल्या असून, ८ टाक्यांचं काम सुरू आहे. संपूर्ण शहराला एक महिन्यात या योजनेतून पाणी दिले जाईल, असे जयअभियंता सरनोबत यांनी सांगितले. मात्र योजना सुरू होवून, सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी, संपूर्ण शहराला पाणी पुरवठा झालेला नाही, मात्र एकट्या माजी मंत्र्यांनी अभ्यंग स्नान केले.

आतापर्यंत थेट पाईपलाईनला ११ वेळा गळती लागली. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली का, अशी विचारणा करत खासदार धनंजय महाडिक यांनी, आपण श्रेय घेण्यासाठी येथे आलो नसून, मदत करण्यासाठी आलोय, असे नमुद केले. थेट पाईपलाईन योजना आणि अमृत योजना या दोन वेगवेगळ्या योजना आहेत. तरीही अमृत योजना पूर्ण झाल्याशिवाय शहराला पाणी मिळणार नाही, ही धक्कादायक बाब असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना १३ वर्षे रखडली. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या निधीतून ही योजना झाली. पण पाईपलाईनला लागत असलेली गळती, पाईपलाईन टाकण्यापासून ते स्पायरल वेल्डेड पाईपपर्यंत या योजनेत गौडबंगाल दिसत आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी करावी लागणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संबंधीत खात्याच्या मंत्र्यांना भेटून, केंद्रीय कमिटीमार्फत काळम्मावाडी योजनेची चौकशी आणि थर्ड पार्टी ऑडिट करू, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिलाय. काळम्मावाडी धरणातून पुईखडीपर्यंत पाणी पोहचले, परंतु कोल्हापूर शहरात महापालिकेकडे सक्षम पाणी पुरवठा वितरणाची यंत्रणा नाही.

पाणी वितरण प्रक्रिया कमकुवत असताना, सतेज पाटील यांनी ही योजना पूर्ण झाली असे खोटे का सांगितले. अजुनही अनेक कामे अपूर्ण आहेत. निश्चितच या योजनेमध्ये काहीतरी गौडबंगाल आहे, असेही महाडिक यांनी नमुद केले. दरम्यान संपूर्ण शहराला एक महिन्यात काळम्मावाडी योजनेचे पाणी सुरू केले जाईल, असे आश्वासन जलअभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी दिले आहे.

त्यानुसार एक महिन्यानंतर पुन्हा जलअभियंत्यांना विचारणा केली जाईल. पण नेहमीच सत्तेत असणार्‍यांचा अधिकार्‍यांवर दबाव आहे, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. सत्यजीत कदम, किरण नकाते, विजय देसाई, राजू जाधव यांनी अपुर्‍या पाणी पुरवठ्यावरून जलअभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. या योजनेची माहिती देताना अनेक वेळा जलअभियंता सरनोबत निरूत्तर झाले.

त्यावेळी खासदार महाडिक यांनी, तुम्हाला निरूत्तर होवून चालणार नाही, शहरवासियांना उत्तर द्यावे लागेेल, असे बजावले. काळम्मावाडी योजना गतीमान कशी होईल, यासाठी तसेच आणखी निधी हवा असेल तर राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू,पण शहरवासियांना शुध्द आणि मुबलक पाणी मिळाले पाहिजे, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. यावेळी संतोष लाड, राजू मोरे, विशाल शिराळकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…